कोंढव्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरण.
तहसिलदार ठोस पावले उचलणार का? फक्त कागदी घोडे नाचविणार?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुणे हवेली तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या पत्राला कात्रज तलाठी अर्चना वनवे-फुंदे यांनी केराची टोपली दाखवली असून त्यांच्यावर कारवाईच होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हकीकत अशी की कोंढव्यात अनेक ठिकाणी अवैध गौण खनिज चालू असल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी मंडल अधिकारी व तलाठ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
परंतु त्या आदेशाला मंडल अधिकाऱ्यांनी व तलाठ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने अजहर खान यांनी विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तलाठ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाईची लेखी मागणी केली होती.
त्या संदर्भात तृप्ती कोलते पाटील यांनी तलाठी अर्चना वनवे यांना ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पत्र काढून ७ दिवसांत त्यांच्या समक्ष लेखी म्हणणेसाठी संधी दिली होती.तर ७ दिवसात खुलासा केला नाही तर काही एक म्हणणे नाही असे समजून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे देखील पत्रात नमूद होते.
परंतु ३ महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापही तलाठी अर्चना वनवे यांनी खुलासा सादर केला नसल्याची माहिती पुणे सिटी टाईम्सच्या हाती आली आहे. तहसिलदारांचयाच दोन्ही पत्रांना वनवे यांनी केराची टोपली दाखवली असताना त्यांच्यावर ठोस कारवाई का नाही?
आजही कोंढव्यात अवैध गौण खनिज उत्खनन चालू असताना व पुर्वीचे उत्खनन असताना शासनाला महसूलाची आवश्यकता नाही का? फक्त सर्व सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारायचा का? तहसिलदार तृप्ती कोलते पाटील ह्या आता पत्रव्यवहारच करत राहणार का?
३ डिसेंबरला काढलेल्या पत्राला ५ महिन्यांचा कालावधी उलटला तर ३ फेब्रुवारीला काढलेल्या पत्राला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे,मग आता तलाठी, मंडळ अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारणार का? का फक्त पत्रांवर पत्रांचे घोडे नाचविणार? असा प्रश्न आता पुणेकरांनी उपस्थित केला आहे.