पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे शहरातील बाजीराव रोडवरील नामांकित गणराज प्युअर व्हेज हॉटेल मध्ये हाणामारीची घटना घडली आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन कुक मध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला या वादातून एका कुकने दुसऱ्या कुकवर धारदार चाकुने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी दि.१ मे रोजी रात्री साडे अकरा वाजता हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली आहे.
याप्रकरणी मंगेश दिगंबरराव सावळे वय-३६ रा. असदपुर, शहापूरगाव ता. चांदूर बाजार, जि.अमरावती, याच्यावर आयपीसी ३२४,३२३,५०४, ३५२, ३७ (१), १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राहुल रतनकुमार बिश्वास वय-३६ रा. हॉटेल स्टाफरूम, बाजीराव रोड, पुणे, यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल व आरोपी मंगेश हे दोघे हॉटेल गणराज मध्ये कुक म्हणून काम करतात. हॉटेलच्या किचनमध्ये आरोपीकडून रवा सांडला होता.
त्या कारणावरुन राहुल बिश्वास आणि मंगेश सावळे यांच्यात किरकोळ वाद झाला होता. फिर्यादी हे हॉटेलमधील काम संपवून हॉटेलच्या स्टाफरूम वर गेले.त्यावेळी आरोपी दारु पिऊन थांबला होता. त्याने सकाळी हॉटेलच्या किचनमध्ये झालेल्या वादाचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली.




