पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
बेकायदेशीरपणे रूफटॉपवर रेस्टॉरंट, हॉटेल चालवले जात असताना आता पुणे महानगर पालिकेची परवानगी घ्यावीच लागणार आहे.रुफटॉप आणि साईड मार्जिनमध्ये चालविण्यात येणाऱ्या रेस्टारंट, हॉटेल, बार, पब यांना चाप बसविण्यासाठी महापालिकेने आता जिल्हा प्रशासन, अबकारी विभाग यांच्याकडे धाव घेतली आहे. अशा प्रकारचा परवाना देताना महापालिकेची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घेण्याचे बंधन घालण्यात यावे अशी मागणी केली आहे.

पुणे शहरात टेरेस, इमारत, बंगला आदींचे साईड मार्जिन मध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल, रेस्टॉरंट,पब व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरु आहे. प्रामुख्याने काही ठिकाणी पब्ज व हुक्का पार्लरही चालविलेले जातात. मागील वर्षभरात कोंढवा येथील लुलानगर येथील व्हेजिटा रेस्टॉरंट रुफटॉप हॉटेल्समध्ये आगीची घटना घडली होती. यानंतर चौफेर टीका झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने ८७ हॉटेलवर कारवाई करून अनधिकृतपणे उभारलेल्या शेड पाडून टाकल्या होत्या.

त्यानंतरही काही व्यावसायिकांनी पुन्हा शेड उभ्या करून हॉटेल सुरु केले आहेत. महापालिकेच्या मिळकत कर विभागाने देखील चारशेहून अधिक अशा मिळकतींवर कारवाई केली आहे. महापालिका सातत्याने कारवाई करीत असली तरी, व्यावसायिकांकडून अनधिकृतपणे टेरेस आणि साईड मार्जिंनच्या जागेचा व्यावसायिक यावर कायमस्वरुपी तोडगा काढत आहे. आता महापालिकेने जिल्हा प्रशासन आणि अबकारी विभागाची मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे.कारवाई केल्यानंतरही पुन्हा बांधकाम करून व्यवसाय सुरु ठेवला जातो.
अशा हॉटेल, रेस्टारंट अँड बारला अबकारी विभागाकडून परवाना दिला जातो, तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही परवाना दिला जातो. हा परवाना देताना महापालिकेची एनओसी घेणे संबंधित व्यावसायिकांना बंधनकारक केले जावे. यामुळे अनधिकृत बांधकाम असलेल्या ठिकाणी व्यवसाय सुरु करता येणार नाही. या प्रकारांना आळा बसेल असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.