पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
लष्कर न्यायालयाने आदेश देऊनही त्या आदेशाकडे दुर्लक्ष करणा-या अधिका-यांची न्यायालयाने चांगलीच खडक पट्टी घेतली आहे. लष्कर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल करून न घेता महिलेला माघारी पाठवणाऱ्या हडपसर पोलिसांना लष्कर न्यायालयाने दणका दिला आहे.
न्यायालयाने याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.पिडीत महिलेने विशाल सुरज सोनकर रा.वानवडी यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. लग्नाचे आमिष दाखवून संशयीत आरोपीने बलात्कार केल्याचे व अनैसर्गिक कृत्य तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
तिचे फोटो नातेवाईकांना पाठविले होते. त्यानुसार लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही.
न्यायालयाने १५६ ( ३) च्या अर्जावर दि.६ ऑक्टोबरला आदेश दिले होते. न्यायालयाचे आदेश असतानाही गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणात अॅड. साजिद शाह यांनी पुन्हा न्यायालयाकडे तक्रार अर्ज केला होता.त्यानुसार न्यायालयाने हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.