आमच्या नादी लागलात तर आम्ही पीआय सारखी तुमची पण बदली करू? गुन्हेगारांचेच पोलिसांना खुले आव्हान.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे : मशिदीसमोरुन मिरवणुक नेण्यास मनाई करुन स्पिकर बंद करायला लावल्या प्रकरणी, स्वारगेट पोलिस ठाण्यात गोंधळ घालून दबाव निर्माण केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी शेकडो लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप मगनशेठ फुलपगारे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानुसार अभय सोनवणे, राहुल खुडे, हेमंत गायकवाड, मंगेश पवार, अक्षय डावरे, बापु खुडे, उज्वला गौड, गणेश शेरला यांच्यासह १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार स्वारगेट पोलीस ठाण्यात व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात २० सप्टेबर रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत घडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, काही जणांनी गणेश विसर्जन मिरवणुक मस्जिद समोरून नेण्यास मनाई केली होती. तसेच स्पिकर बंद करायला भाग पाडल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे काही लोकांनी पुण्याचा वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला?
व स्पीकर बंद करण्यास सांगणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी जमाव जमवून स्वारगेट पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला, परंतु सदरील प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यासारखे काहीच नसल्याने, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जमलेल्या जमावाची समजूत काढली.
परंतु दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, दंगली भडकतील असे चिथावणीखोर वक्तव्य करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकारी यांना शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्याविरुद्ध धाकदपटशाहीचा वापर करुन जमावाला भडकावून त्यांच्या येण्या जाणयचा मार्ग अडविला. खासगी मालकीच्या चारचाकी गाड्या पोलीस ठाण्याच्या आवारात लावून पोलीस वाहनांची कोंडी केली. तसेच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय फायदा उचलून दिलीप मगनशेठ फुलपगारे यांची अचानकपणे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी चतुर्शिंगी पोलिस ठाण्यातील पीआय नांद्रे ( गुन्हे) यांना स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. म्हणजे आता पोलिस खाते सुध्दा दडपणाखाली असल्याचे सांगितले जात आहे.
स्वारगेट पोलिस ठाण्यात अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फुलपगारे यांनी चांगले काम करत असताना, व चुकिच्या कामाला भिक घातली नसल्याने, त्यांचा बळी घेण्यात आला आहे. आता ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेच आमच्यावर वरचढ झाले असून, आमच्या विरोधात जाणाऱ्याला काही करू शकतो? असे म्हणत पोलिस खात्याची बदनामी चालू केली आहे.
स्वताला कार्यकर्ते म्हणणारेच गुन्हेगार असून त्यातील काही लोकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे. पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली जात आहे यात शंकाच नाही.