कोंढवा वाहतूक पोलिस नागरिकांच्या तक्रारींना दाखवतात केराची टोपली.
वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ विजयकुमार मगर गांभिर्याने दखल घेण्याची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील उपनगर भाग म्हणजे कोंढवा, या कोंढवा मध्ये वाहतूकीचा कोंडमारा होत असतानाही वाहतूक पोलिस मलाईच्या नादात नागरिकांचा जीव टांगणीला लावत आहेत. कोंढवा मध्ये सध्या अवैध रिक्षा वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येते. क्षमतेपेक्षा जास्त व एका रिक्षात सहा सात लोकांना अक्षरश कोंबून नेत असल्याचे कोंढवाकरांना रोजच दिसत असते, परंतु या मागची यंत्रणा भलतेच उद्योग करत असल्याचे पुणे सिटी टाईम्सच्या हाती पुरावे आले आहेत.
पुणे सिटी टाईम्सने ६ डिसेंबर रोजी कोंढव्यात वाहतूकीचा कोंडमारा, वाहतूक पोलिसांच्या आशिर्वादाने फोफावली अवैध रिक्षा वाहतूक? या सदराखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीला कोंढवाकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून,कोंढवा वाहतूक पोलिसांचे अनेक “खाचेखुचे” चा पोल आता जनताच उघडकीस आणत आहे.
काही दिवसांपूर्वी कोंढवा वाहतूक संदर्भात आणि वाहतूक पोलिसांच्या हप्ता वसुली संदर्भात नागरिकांनी थेट तक्रार वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ विजयकुमार मगर यांच्याकडे तक्रारींचा पाडाच वाचला होता. त्या वेळी मगर यांनी कोंढवा वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी घेतली होती. त्या दरम्यान एक दोन दिवस फक्त नावाला कारवाई करण्यात आली होती. परंतु कोंढवा वाहतूक विभागाने नंतर येरे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती निर्माण केली आहे.
मागील बातमी }}}}}} pune kondwa | कोंढव्यात वाहतूकीचा कोंडमारा, वाहतूक पोलिसांच्या आशिर्वादाने फोफावली अवैध रिक्षा वाहतूक?
कोंढवा मध्ये आज पासिंग नसलेली, इंशुरन्स नसलेली, लायसन्स, बॅज, पियुसी, नसलेली वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यावर धावत आहे. कारण कोंढवा वाहतूक पोलिसच आता वसुली पंटर होऊन सदरील अवैध रिक्षा वाहतूक करण्यास काही रिक्षा चालकांना भाग पाडत असल्याचे काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्याचे कारण असे सांगण्यात आले की, लेखी तक्रार केल्यानंतर कोंढवा वाहतूक पोलिस अधिकारी रिक्षा चालकांना नावे सांगून आप अपसात भांडणे लावून आपली भाकरी शिजवून घेत आहेत.
लाईन वरील गाडयांवर कारवाई न करता चांगलीच मलाई चाखत आहेत. मलाई जमा करणारे एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तर चार चार वसुली पंटर वसुलीसाठी दिवसरात्र कष्ट करत असल्याची चर्चा कोंढवा वाहतूक विभागात ऐकायला मिळत आहे. कोंढवा वाहतूक विभागात गाडया पकडून आणतात आणि आर्थिक साटेलोटे करून छपाई केली जात असल्याचा आरोप काहींनी केला आहे.
वाहतूक पोलिस छपाईवर जास्त लक्ष केंद्रित केल्याने कोंढवाकरांना फक्त आणि फक्त वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोंढवा वाहतूक विभागातील सर्वांचीच चौकशी मागणी होत असल्याने आता वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ विजयकुमार मगर यांनी स्वत होऊन कोंढव्याची पाहणी करून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.