कोंढव्यातील गौण खनिज बाबतीत हवेली तहसिलदारांनी काढलेल्या पत्राला तलाठ्यांकडून केराची टोपली!

0
Spread the love

कोंढवा खुर्द मधील अवैध गौण खनिजाचे काय?

मिलीभगत असल्यानेच शासनाचा बुडत आहे लाखोंचा महसूल?

तलाठी मॅडम २-३ गुंठ्याच्या अवैध गौण खनिज बाबतीत लक्ष देत नसल्याची कार्यालयात चर्चेवर चर्चा.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, कोंढव्यातील अनेक भागात गौण खनिज उत्खनन केले जात असल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती.

त्याची दखल घेऊन पुणे हवेली तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी ३ डिसेंबर रोजी पत्र काढून पुणे सिटी टाईम्सने बातमीत नमूद केलेनुसार मौजे कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक ता. हवेली सुरु असलेल्या अनाधिकृत उत्खननाबाबत व तात्पूरता गौणखनिज परवानगी घेतलेल्या प्रकरणांमध्ये जेवढया ब्रासची परवानगी घेतली आहे.

तेवढयाच ब्रासचे उत्खनन झाले आहे किंवा कसे? याबाबत शहानिशा करुन तात्काळ अहवाल इकडेस सादर करण्याचे पत्रात नमूद होते.

परंतु आज ३ जानेवारी २०२२ चा सुर्य मावळला तरी अद्यापही कोंढवा तलाठी अर्चना वनवे-फुंदे यांनी अहवाल सादर केलेला नाही? आज कोंढवा खुर्द येथे अवैध गौण खनिज उत्खनन झाले असताना तलाठ्यांकडून दुर्लक्ष का केले जात आहे.

२५ नोव्हेंबर रोजी तलाठ्यांनी केलेली पाहणीतून आज बर्याच ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी फुटींग ( खड्डे भरणे) भरून कामे जोरात सुरू केली आहे. आता मोजणी व पंचनामे करायचे असेल तर ते कसे करणार? का यात सुध्दा मोजमाप कमी करून बांधकाम व्यावसायिकांना पाठिशी घालणार? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

जुनी दंड वसूली वर जोर दिला जात असून मग कोंढव्यातील अवैध गौण खनिजातून उत्पन्न महसूल मिळणार नाही का? एकेकाकडून पाच-दहा लाखांचा दंड मिळाला तरी शासनाच्या तिजोरीत भर पडेल परंतु याकडे खरंच तहसिलदार दुर्लक्ष का करत आहोत? तहसिलदारांनी ठोस कारवाई केली असती तर आज अवैध गौण खनिज करणा-यांचे धाबे दणाणले असते, तहसिलदारांच्या दुर्लक्षामुळेच आज ४० दिवस उलटले तरी तलाठी अर्चना वनवे यांनी पंचनामा सादर केलेला नाही.

याला सर्कल, मंडल अधिकारी व तहसिलदारांचे छुपे समर्थन तर नाही ना? किंवा त्यांना अभय तर दिला जात नाही ना? असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जात आहे. तलाठ्यांनी अजूनही अहवाल सादर न केल्याने आता तहसिलदार तृप्ती कोलते पाटील हे कोणती कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी अर्चना वनवे यांना संपर्क केला असता फोन नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यचे समजले तर तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here